पैठणवासियांची नदी प्रदूषणाची व्यथा

1 Oct 2015
0 mins read
पण जी पंढरपूरची तीच गोष्ट पैठणची असे म्हणावयाची पाळी आज पैठणकरांवर आली आहे. माझे एक नातेवाईक पंढरपूरला राहतात. यात्रेच्या पंधरा दिवसात पंढरपूरकर हैराण होवून जातात. दिवसेंदिवस यात्रेकरूंची संख्या वाढत चालली आहे. यावर्षी तर हा आकडा सात लाखांच्या घरात जावून पोहोचला. या पाहुण्यांचे मलमूत्र विसर्जन, त्यांची प्रवाहातील आंघोळ, त्यांचे कपडे धुणे यामुळे जे प्रदूषण तिथे होते त्याचा परिणाम इतका भयानक असतो की तिथून पळून जावे की काय असे वायावयास लागते असे पंढरपूर वासियांना वाटते. हे सर्व यात्रेकरू आपापल्या गावातून जेव्हा येत जात असतील तेव्हा वाटेवरचे मलमूत्र विसर्जन किती नुकसान करीत असेल याचा विचारच असह्य वाटतो. माझे एक जवळचे मित्र दरवर्षी वारीला जात असतात. त्यांना मी हा प्रश्न भीतभीत विचारला. त्यांनी स्वत:पुरते जे उत्तर दिले ते अत्यंत समर्पक होते. ते म्हणाले - मी जेव्हा वाटेत मलविसर्जन करतो, त्यावेळी जवळपासच्या शेतात जातो. त्याठिकाणी खड्डा करतो, त्या खड्ड्यात मलविसर्जन व नंतर खड्डा मातीने बुजवून टाकतो. अशी पध्दती किती यात्रेकरू पाळत असतील ? एका मलविसर्जनात जवळपास एक कोटी जीवाणू असतात असे मध्यंतरी एका लेखात मी वाचले. मुक्त हागणदारी हा बऱ्याच विकारांचा शत्रु आहे. विशेषत: यामुळे पोलिओ निर्मूलनात बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे या यात्रांवर व वाऱ्यांवर काही बंधने घालण्याची आज गरज निर्माण झाली आहे. मी नास्तिक नाही, पण आरोग्याला व स्वच्छतेला तिलांजली देणाऱ्या या कृत्यांना माझा ठाम विरोध आहे, असो.

पैठण शहरही याच दुर्गतीमधून जात आहे. मृत व्यक्तींच्या अस्थी व रक्षा विसर्जन पैठणजवळील गोदावरी नदीत अव्याहतपणे चालत असते. खरे पाहिले असता या अस्थि आणि रक्षा शेतीसाठी अत्यंत चांगले खत आहे. त्यामुळे त्याचे विसर्जन नदीत न करता शेतात केले तर मेल्यावर सुध्दा शरीर समाजाला अत्यंत उपयुक्त ठरू शकते. पण जुन्या परंपरा पाळण्यासाठी त्यांचे विसर्जन नदीत केल्यामुळे आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होवू शकतात हे माणूस कधी शिकणार ? बरे, बाहेरून आलेल्या माणसांना याचे काही सुखदु:खही नाही कारण त्याचा त्रास होत असतांना ते मात्र आपल्या गावाला निघून गेलेले असतात व बळी मात्र पैठणचे लोक पडतात. अस्थि व रक्षा विसर्जनाचे सोपस्कार पार पडत असतांना त्याबरोबर आणलेले हार व फुले सुध्दा नदीत विसर्जित केले जातात. पाण्यात जास्त काल राहिल्यामुळे ते सडतात व त्याची दुर्गंधी पण सुटावयास लागते. म्हणजे प्रदूषण तर होतेच होते पण त्याला साथ या दुर्गंधीची पण मिळते.

प्रश्न येथे संपत नाही. महाराष्ट्रातून अंत्यसंस्कारानंतरचे विधी करण्यासाठी बरीच कुटुंबे पैठणला येत असतात. जवळच्या नातेवाईकांचे केशवपन करण्याचा विधीही पैठणला पार पाडला जातो. हे केसही नदीतच विसर्जित केले जातात. खरे पाहिले असता त्यासाठी वेगळी जागा ठेवण्यात आली आहे. पण त्याकडे कोणतेही लक्ष न देता हे केसही नदीतच विसर्जित केले जातात. जणू काय सर्वांची सर्व पापे धुवून काढण्याचा ठेका नदीनेच घेतला आहे. नदीला आपण मातेचा दर्जा दिला आहे पण आपले तिच्याशी असलेले वर्तन मात्र अतर्क्य आहे. परदेशात नदीच्या काठावर उभे राहिले असता तिचा तळ सुध्दा अत्यंत स्पष्टपणे दिसतो. आपल्या सर्व नद्यांचे पाणी वरून पाहतांना हिरवे दिसते.

नदी व तलावांतील पाण्याच्या बाबतीत परदेशी नागरिक किती जागरूक असतात या संबंधातील एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. अमेरिकेतील एका शहरात असलेल्या तळ्याच्या काठावर सीसीटी कॅमेरे बसविले आहेत. रात्री 1.30 वाजता एका कॅमेरावर एक व्यक्ती तलावात लघुशंका करतानाचे दृष्य टिपण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या कॅमेऱ्याचे फूटेज पाहात असतांना नगरपालिकेने त्या कृत्याची दखल घेतली. संचालक मंडळाच्या सभेत संपूर्ण तलाव रिकामा करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही लोकांनी एवढेसे अशुध्द पाणी सर्व पाण्याला अशुध्द करणार नाही म्हणून हा खटाटोप करू नये असा सल्ला दिला. पण हा प्रश्न शुध्दतेचा नसून भावनेचा आहे असा निर्णय घेण्यात येवून संपूर्ण तलाव पंप लावून रिकामा करण्यात आला. या उदाहरणाच्या पार्श्वभूमीवर आपण आपल्या देशातील चित्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केल्यास घोर निराशा पदरी पडते. त्याचबरोबर आपल्याला शुध्दतेच्या बाबतीत किती मजल गाठावयाची आहे याचा अंदाजही येवू शकतो.

गोदावरीचा पैठण येथील घाट स्वच्छ व सुंदर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मध्यंतरी 28 कोटी रूपये खर्च केले असे कळते. पण आज या घाटाची अवस्था पाहिली तर हा पैसा पाण्यात गेला असे म्हणावेसे वाटते.

यावर कडी म्हणजे याच कामासाठी नव्याने 48 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत असे कळते. याचीही विल्हेवाट आधी सारखीच लागू नये याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

गोदावरी पात्र जल सहभागितेची स्थापना करणे गरजेचे :


जागतिक जलतज्ज्ञ मान्यवर डॉ.माधवराव चितळे यांनी जलसहभागितेची संकल्पना या संदर्भात मांडली आहे. ती काय आहे याचा आपण थोडक्यात विचार करू. कोणताही पाणी प्रश्न हा सरकारचा किंवा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा समजणे योग्य नाही तर त्या पाण्याशी निगडित जो जन समूह आहे (स्टेक होल्डर्स) त्याने त्या पाण्याचे संबंधात निर्णय घ्यावेत अशी संकल्पना त्यांनी जगाच्या मंचावर मांडली. त्यावर नेपाळ येथे भरलेल्या परिषदेत सविस्तर चर्चा करण्यात येवून ती कल्पना जगाने उचलून धरली. त्याला अनुसरून विदर्भातील खारपाण पट्ट्यात स्थापन झालेली पूर्णा नदी जल सहभागिता, पाताळगंगा येथे स्थापन झालेली पाताळगंगा जलसहभागिता, पुणे येथे स्थापन झालेली अप्पर भीमा जल सहभागिता, नाशिक येथे स्थापन झालेली गोदावरी नदी जल सहभागिता, मध्यप्रदेशातील ऊजैनजवळ स्थापन झालेली क्षिप्रा नदी जल सहभागिता या संस्था स्थापित करण्यात आल्या. पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंकेतही अशा प्रकारच्या जलसहभागिता स्थापित करण्यात आल्या आहेत. या संस्था नेमक्या काय करतात व त्या कशा स्थापल्या जावू शकतात याचा आपण थोडक्यात मागोवा घेवू या.

1. ज्या ज्या व्यक्तींना वा संस्थांना या नदी व्यवस्थेत सुधारणा व्हावी असे वाटते त्यांनी संघटित होण्याच्या दृष्टीने एक प्राथमिक सभा घेवून आपल्या कार्याची व्याप्ती काय राहील याची प्राथमिक चर्चा करणे.
2. सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, महिला मंडळे, रोटरी, लायन्स सारख्या सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, शहरात चालणारी दैनिके व नियतकालिके यांच्या पदाधिकाऱ्यांना या प्राथमिक सभेस पाचारण करावे. गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना सुध्दा या सभेस बोलवावे. त्यामुळे स्थापन होणाऱ्या संस्थेला वजन प्राप्त होईल.
3. वरील उपस्थितांपैकी ज्या उत्साही व्यक्ती असतील त्यांची एक हंगामी समिती स्थापित करून पुढील कारवाईची जबाबदारी त्यांच्यावर सोपविणे.
4. पत्रव्यवहार, कार्यालयीन कामे चांगल्या प्रकारे सुरू व्हावीत या दृष्टीने एखादे कार्यालय स्थापित करणे. सुरूवातीला एखाद्या पदाधिकाऱ्याचे घरी सुध्दा ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात केली जावू शकते.
5. संस्थेला काही प्राथमिक स्वरूपाचा खर्च असतो. या खर्चासाठी सर्व संभाव्य सभासदांकडून माफक वर्गणी स्विकारावी म्हणजे खर्चावर भार कोण्याएकावर पडणार नाही.
6. संस्थेचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थेची एक औपचारिक घटना तयार करावी. यासाठी वाटल्यास तीन - चार जणांची एक घटना समिती स्थापन करावी, कच्चा आराखडा तयार झाला म्हणजे सर्व संभाव्य सभासदांची सभा घेवून त्यांच्यासमोर तो मसूदा संमती साठी ठेवावा, सविस्तर चर्चा करून सदर मसूद्याला अंतीम स्वरूप द्यावे.
7. आता संस्थेचे पंजीयन (रजिस्ट्रेशन) करावयास हरकत नाही. चॅरिटी कमिश्नर कडे अशा संस्थांचे पंजीयन होते. आपला एखादा सभासद वकील असल्यास तो हे सर्व काम करण्याची जबाबदारी स्विकारू शकेल.
8. आता आपल्या संस्थेला कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे संबंधित प्रश्नाची दखल घ्यायला आपल्याला कायदेशीर हक्क प्राप्त झालेला राहील व त्यामुळे आपले विचार समोरच्या अधिकाऱ्यांना विचारात घ्यावेच लागतील.
9. सभासदांची महिन्यात एक सभा घेवून त्या सभेत आपले नजिकचे व दीर्घकालीन धोरण ठरवावे लागेल. स्थानिक वर्तमानपत्रात आपण शहरातील नागरिकांच्या आपल्यापासून काय अपेक्षा आहेत याची चाचपणी करीत राहणे सुध्दा आपल्या दृष्टीने आवश्यक ठरेल. यावरून आपल्या कार्याची रूपरेषा आखणे सोपे जाईल.
10. दरवर्षी आपण आपल्या संस्थेच्या वतीने नदीच्या घाटावर वेरूळ महोत्सवासारखा एक नागरिकांचा मेळावा घ्यावा. या मेळाव्यात पर्यावरण, शहराची स्वच्छता, गावाचे आरोग्य, सध्या भेडसावणारा पाणी प्रश्न इत्यादि विषयांवर प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत ज्यामुळे आपले कार्य शहरवासियांच्या नजरेसमोर राहील व आवश्यक त्यावेळी आपण हाक दिल्यास नागरिकांचा ताफा आपल्या मदतील धावून येईल.
11. आपण आपल्या जल सहभागितेत पत्रकार व्यावसायिकांनाही सम्मिलित करून घेतले आहे. या कार्याच्या संदर्भात त्यांनाही फार मोलाची मदत करावी लागेल. हे कार्य सतत जागे राहील, जनतेच्या नजरेसमोर राहील यासाठी त्यांना आपल्या दैनिकात / नियतकालिकात पाणी प्रश्न सतत पेटता ठेवावा लागेल. काहीही चुकीचे घडत असेल तर त्याला चाप बसण्यासाठी अग्रलेख लिहावे लागतील. या पिषयावर लोकांना लिहिते करावे लागेल. वेळप्रसंगी आंदोलनांना प्रोत्साहित करावे लागेल.

आपले प्रश्न आपणच सोडवावे :


आज सरकार डोळ्यासमोर कातडे ओढून बसले आहे. त्याची निर्णयक्षमता रसातळाला जावून पोहोचली आहे. संसदेत असलेल्या खासदारांपैकी जवळपास निम्मे खासदार कोणत्या ना कोणत्या गुन्ह्याशी निगडित असल्याच्या बातम्या आपण दररोज वाचतच असतो. ते आपल्यासाठी काही करू शकतील यावर जनतेचा विश्वासच राहिलेला नाही. मग हे प्रश्न असेच राहू द्यावयाचे काय हा प्रश्न आपल्या मनाला विचारा. त्याचा त्रास आपल्यालाच होत आहे. आपले आरोग्य, आपले स्वास्थ्य धोक्यात आले आहे. आपण जर हातपाय हालवले नाहीत तर पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही याची जाणीव असू द्या. या कामी सरकारने मदत केली तर चांगलेच पण त्यावर विसंबून राहू नका. जो सरकार वरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला असे मानण्याची पाळी आली आहे.

आपल्या कार्याची दिशा काय असावी?


आपली संस्था निव्वळ फॅशन म्हणून सुरू करण्यात आली नाही याची जाणीव ठेवा. या संस्थेला समाजोपयोगी कार्य करावयाचे आहे. आपल्याला जागल्याचे काम करावयाचे आहे. नदीच्या पात्रात जो जो घाण टाकत असेल, जो जो प्रदूषण करीत असेल त्याला त्याची जाणीव करून द्यावयाची आहे. यात आपल्याला कलह निर्माण करावयाचा नाही तर सर्व कार्य समजूतीने पार पाडावयाचे आहे. लोकांना रागवून, तंटे बखेडे करून काहीही साध्य होणार नाही. लोकांच्या अंतरमनाला आपल्याला हात घालावयाचा आहे. नदी पवित्र आहे याची त्यांनाही जाण आहे, फक्त त्यांच्या भावनेला आवाहन करून आपल्याला कार्यभाग साध्य करावयाचा आहे. या संबंधात आपण काय करावे याची यादी खालीलप्रमाणे तयार करता येईल -

1. स्थानिक नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना या कामात मदत करण्याचे आवाहन करावे. खरे पाहिले तर गावाचे आरोग्य व स्वच्छता टिकवून ठेवणे हे त्यांचे काम आहे. यासाठी त्यांनी कशा प्रकारे सहकार्य करावे या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून काय काम करावयाचे आहे याची यादी तयार करावी. नगरपालिकेतील कोणता अधिकारी या कामाची जबाबदारी स्विकारणार आहे हे निश्चित करावे म्हणजे त्याच्याशी कायमचा संपर्क ठेवता येईल.
2. नगरपालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात यासाठी काय तरतूद करण्यात आली आहे हे बघावे. तशी तरतूद केली नसेल तर ती तरतूद केली जावी याबद्दल आग्रह धरावा.
3. ही रक्कम योग्य कारणासाठी खर्च होत आहे किंवा नाही यावर बारकाईने देखरेख करावी म्हणजे हा पैसा सत्कारणी लागेल.
4. नदीच्या घाटावर समाजाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे दाखविण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी मोठमोठे बोर्ड लावावेत. त्यात कृती आराखडा देवून तो साध्य करण्यासाठी जनतेला आवाहन करावे.
5. घाटाच्या परिसरात केस, हार, फुले जमा करण्यासाठी जागा निश्चित करण्यात याव्या. यापासून सुंदर गांडूळ खत तयार केले जावू शकते. हा व्यवहार मोठा असल्यामुळे हे खत मोठ्या प्रमाणावर तयार होईल. या कामासाठी कर्मचारी नियुक्त केल्यास त्याचा पगार सहजपणे निघू शकेल इतके उत्पन्नतर सहजपणे मिळू शकेल. थोडक्यात सांगावयाचे तर ज्या गोष्टीचा उपद्रव होणार होता तो तर थांबेलच पण त्याचबरोबर रोजगार निर्माण होवून उत्कृष्ठ दर्जाचे खत सुध्दा उपलब्ध होईल.
6. स्थानिक शेतकऱ्यांची एक सभा घेवून त्यांना राख व हाडे शेतासाठी कसे उत्कृष्ट खत आहे हे समजावून सांगावे व याचा वापर कसा करावा याबद्दल माहिती द्यावी. घाटावरील एखादी जागा निश्चित करून त्या ठिकाणी राख व हाडे एकत्र जमा करण्याची व्यवस्था करावी म्हणजे शेतकऱ्यांना ते नेणे सोयीचे जाईल. माणसाचा जन्म मातीत होतो व मातीतच त्याचा अंत होतो हे आपल्याला माहित असतांना सुध्दा नदी मध्ये येण्याचे खरे म्हंटले तर काहीच कारण नाही.
7. घाटावर अंत्य संस्काराशी संबंधित विधी करणारे ब्राम्हण हा एक मोठा वर्ग पैठण शहरात आहे. यांचे जर सहकार्य आपण मागितले तर प्रश्न अधिक सहजपणे सुटू शकतो. परंपरागत काम करणारे विचार करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांच्या विचाराला चालना देण्यात आपण यशस्वी ठरलो तर त्यांच्यामध्ये आपण सहजपणे बदल घडवून आणू शकतो. ते पण पैठण शहराचे नागरिक आहेत. त्यांनाही त्यांच्या आरोग्याची काळजी आहेच. त्यामुळे ते आपल्या कामात निश्चितच सहकार्य करावयास तयार होतील.
8. तरूण, विद्यार्थी व महिला यांनाही या कार्याशी जोडून घेणे आवश्यक आहे. यांचेमध्ये बदल घडवून आणण्याचे खूप सामर्थ्य आहे. स्वयंसेवक म्हणून त्यांचे मोलाचे सहकार्य मिळू शकेल.
9. शाळांत व महाविद्यालयात यासंबंधात एखादे अभियान सुरू केल्यास विद्यार्थ्यांत मानसिक बदल घडवून येवू शकतो. हा बदलच दीर्घ काळात आपल्या कामी येवू शकतो.

पैठण शहरातील नागिरकांना आवाहन :


पैठण शहरातील नागरिकांनी या कार्यात पुढाकार घेणे आवश्यक आहे. ठेविले अनंते, तैसेची राहावे हा जुना विचार झाला. आपण नवभारताचे नागरिक आहोत. पाणी आणि आरोग्य यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आज जगाने पाण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. पाण्याला WATER म्हणावयाचे ऐवजी आज WASH हा शब्दप्रयोग वापरला जातो. त्याचा अर्थ WAter in relation to Sanitation and Hygiene असा आहे. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास स्वच्छता आणि आरोग्य यांचेशिवाय पाण्याचा विचारच होवू शकत नाही असा विचार आज मांडण्यात येत आहे. माणसाचे 90 टक्के विकार प्रदूषित पाण्यामुळे होतात असे वैद्यक शास्त्र म्हणते. शुध्द पाणी ज्याचे घरी तेथे आरोग्य वास करी असे उगाचच म्हंटले जात नाही. त्यामुळे आपल्या परिसरातील जलस्त्रोत स्वच्छ ठेवा हे आपल्याला पटले तरच प्रस्तुत लेख सत्कारणी लागला असे मी समजीन.

लेखक परिचय
डॉ.दत्ता देशकर

नदीच्या काठावर शहर असणे ही खरे म्हंटले तर अभिमानाची गोष्ट समजावयास हवी. आणि ही नदी कोणती, तर गोदावरी. गोदावरी सारख्या मोठ्या नदीच्या तीरावर पैठण सारखे इतिहास प्रसिध्द शहर वसले आहे याचा पैठणकरांना अभिमान असावयास हवा. कोणे एके काळी पैठणला दक्षिण काशी या नावाने ओळखले जात असे. धार्मिक शिक्षणाचे ते एक मोठे केंद्र होते. पैठणच्या परिसरात कित्येक संतांचा वास होता. आजही पैठणचे हे धार्मिक स्थान टिकून आहे. (मो : 9325203109)

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading