तुझे आहे तुजपाशी


जलसाठे वाढविण्याची ही चतु:सूत्री गावकर्‍यांनी अंगीकारल्यास गाव जलसमृध्द होवून गाव आपला विकास सहजपणे करू शकेल. हेच राजेंद्रसिंगांनी केले, आण्णा हजारेंनी केले, पोपटराव पवारांनी केले व सुरेश खानापूरकरांनी केले. आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समृध्दीची वाटचाल करू या. आपल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक राजेंद्रसिंग, एक आण्णा हजारे, एक पोपटराव पवार, एक सुरेश खानापूरकर दडला आहे. वेळ आहे त्याला बाहेर काढायची.

महाराष्ट्र वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळून निघत आहे. दर दोन तीन वर्ष गेली म्हणजे दुष्काळ तोंड वरती काढतो व जे काही एक दोन वर्ष शेतकर्‍याने कमविले ते धुवून घेवून जातो. तुम्हाला ती माकडाची गोष्ट माहित असेल जे झाडावर एक फूट चढत होते व दोन फूट खाली घसरत होते. आपल्या शेतीची स्थिती अगदी त्या माकडासारखी झालेली आहे. बुडत्याचा पाय खोलात या उक्तीप्रमाणे आपली गत झालेली आहे. शेती तोट्याची झाली असून त्याचे परिणाम शेतकर्‍याच्या कुटुंब व्यवस्थेवर झाले आहे. शेतावर काम नाही म्हणून खेड्यातील तरूणांचा लोंढा शहराकडे धाव घेत आहे. खेड्यात उरलेल्या म्हातार्‍यांकडून व बायका पोरांपासून शेतीची देखभाल होत नाही व शेती व्यवसाय हा आतबट्ट्याचा होत चालला आहे.

शहरातील लोक गुंतवणूक म्हणून शेतीकडे बघायला लागले आहेत. मोठ्या प्रमाणावर विक्री चालू असून शेतकरी शेतमजूर बनत चालले आहेत. खरेदी केलेली जमीन पडीत ठेवण्याकडे या नव शेतकर्‍यांचा प्रयत्न आहे. त्यांना शेती कसण्यात रस नाही तर शेतीच्या वाढत्या किंमतींचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली ती गुंतवणूक राहते. कोणालाही शेतीच्या दीर्घ कालीन विकासात रस उरलेला नाही व त्यामुळे ग्रामीण भागात एक निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरे पाहिले असता शहरातील व्यापारी व खेड्यातील शेतकरी हे दोघेही व्यावसायिक आहेत. शेतकरी शेताच्या अल्पकालीन योजना घेण्यातच गुंतलेला असतो तर शहरातील व्यापारी हा आपल्या व्यवसायाच्या निव्वळ अल्पकालीनच नव्हे तर दीर्घकालीन विकासाबद्दलही विचार करीत असतो. शहरातला व्यापारी आपल्या व्यवसायाचा विस्तार व विकास याबद्दल जास्त जागरूक असतो पण शेतकरी मात्र आजचा दिवस कसा निभेल याच्या विवंचनेतच व्यग्र असतो.

या सर्व गोंधळात आणखी गोंधळ म्हणून पावसानेही आपला स्वभाव बदलेला आढळतो. आधीच तो बेभरवशाचा होता, आता तर तो जास्तच अनियमित झालेला आहे. यामुळे तर शेतकर्‍यांची झोपच उडालेली आपण पाहतो. आता पर्यंत पावसाच्या वागणूकीवर आपण खरीप व रब्बी अशी पीक रचना स्विकारलेली होती. उन्हाळ्यात शेतीची मशागत होत असे. जूनच्या सुरूवातीला पावसाळ्याला सुरूवात होत असे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या होवून जुलै व ऑगस्टमध्ये पिकांचा विकास होत असे व सप्टेंबर महिन्यात खरीपाचे उत्पन्न हातात पडत असे. शिवाय हा महिना रब्बीसाठी जमीन तयार करण्यासही वेळ देत होता. ऑक्टोबर महिन्यात रब्बीच्या पेरण्या होवून फेब्रुवारीत पुन्हा शेतकरी निश्‍चिंत मनाने पिकाचे पैसे कनवटीला बांधायला मोकळा असे. हे टाईमटेबल थोड्याफार फरकाने दरवर्षी यथास्थित चालू होते.

पण गेल्या काही वर्षांपासून मात्र परिस्थितीत मोठे बदल जाणवत आहेत. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत पावसाला सुरूवात होत नाही. शेतकरी जमीन तयार करून पावसाकडे डोळे लावून बसतो पण पाऊस मात्र त्याला हुलकावणी देतो. काही पिकांची विशिष्ट वेळीच पेरणी होणे आवश्यक असते. वेळ निघून गेल्यानंतर पेरणी केली तर हाती काहीच लागत नाही. बरेचदा तर दुबार पेरणी करण्याचे संकट येवून ठेपते. पहिल्याच पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करतांना शेतकर्‍यांच्या नाकी नऊ आलेले असतात. त्यामुळे दुबार पेरणी करतांना त्याचे कंबरडेच मोडते. बघताबघता खरीप हातातून निघून गेलेला असतो व त्याच्या संपूर्ण आशा आता रब्बीवर केंद्रित झाल्या असतात. रब्बीची परणी ठीक होते. उगवणही चांगली होते. शेतकर्‍यांच्या आशा फुलायला लागतात. पण पावसाळा हात आखडता घेतो. त्यामुळे नेमके पिकात दाणे भरण्याचे वेळी जमिनीतील ओल कमी होते. आवश्यक तेवढे दाणेच भरत नाहीत व जे भरतात ते बारीक पडतात. त्यामुळे शेवटी झडती कमी भरते. अशा प्रकारे शेवटी खरीप व रब्बी दोनही हंगाम दगा देतात व शेतकरी बिचारा अडचणीत सापडतो. वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतलेले कर्ज चुकवतांना त्याच्या डोळ्यात पाणी येते. घरखर्च मात्र थांबत नाहीत व उत्पन्न व खर्च यांची तोंड मिळवणी न झाल्यामुळे शेवटी निराश होवून बरेचसे शेतकरी आत्महत्या करावयास प्रवृत्त होतात.

पिक घेण्यासाठी केलेला खर्च व हाती आलेले कमी उत्पादन यामुळे त्याचा उत्पादन खर्च वाढलेला असतो. तयार झालेला माल जेव्हा तो बाजारात घेवून जातो त्यावेळी त्याला मिळणारी किंमत इतकी कमी मिळते की त्याचा उत्पादन खर्चही भरून निघत नाही. सरकारने बांधून दिलेले भाव शेतकर्‍याला परवडत नाहीत. कारण त्यामुळे उत्पादन खर्चही भरून निघत नाही. अशा दुष्ट चक्रात शेतकरी बुडून बसला आहे. भाव वाढण्याची वाट पाहणे त्याला शक्य नसते कारण बरेच खर्च वाट पाहात असतात. ते भागविण्यासाठी त्याला तयार झालेल्या मालाला बाजार दाखवावाच लागतो. त्याचा फायदा व्यापारी वर्ग घेतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास धान्य पिकवतो शेतकरी पण त्याचा लाभ मात्र तो न घेता व्यापारी वर्ग घेवून बसतो.

वरील विवेचनावरून पाण्याची तुटपुंजी व्यवस्था व मालाला न मिळणारी योग्य किंमत हे शेतकर्‍याचे दोन महत्वाचे शत्रू आहेत ही बाब आपल्या लक्षात येते. या पैकी पहिल्या शत्रुवर आपण आपले लक्ष केंद्रित करू या. गेल्या १००- १५० वर्षांचा अभ्यास केला तर पाऊस पडलाच नाही असे एकही वर्ष गेलेले नाही. तो नुसता पडतच नाही तर दरवर्षी जवळपास सरासरीही गाठण्याचा प्रयत्न करतो. जरी ती पूर्णपणे गाठली गेली नाही तरी ५० टक्क्यापेक्षा दरवर्षी जास्त पाऊस पडतो हे मात्र नक्की. महाराष्ट्रात सरासरीने जवळपास ६०० ते ८०० मि.मी पाऊस पडतो. काही भागात तर त्याच्यापेक्षाही जास्त पडतो. या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत स्पष्टपणे मांडणे आवश्यक आहे ती म्हणजे माणसाला साधारण जीवन जगण्यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन झाल्यास ३०० मि.मी पाऊस खरे तर पुरेसा आहे. पण आपला हव्यास आपल्याला अडचणीत आणत आहे. आपण आंथरूण पाहून पाय पसरायला शिकले पाहिजे.

पाऊस अनियमित झाला आहे हे एकदम मान्य पण तो पडतच नाही असे नाही. तो स्वत:च्या मर्जीनुसार पडतो. असे असेल तर त्याला थोपविणे वा अडवणे ही आपली जबाबदारी नाही का ? आपल्या देशात पडलेल्या पावसापैकी फक्त १० टक्के पाऊस अडविला जातो. ऊरलेल्या ९० टक्क्याचे काय होते याचा आपण कधी विचार केला आहे का ? या पैकी निम्मा पाऊस बाष्पीभवनाद्वारे सूर्यनारायण घेवून जातो व बाकीचा वाहून समुद्राकडे जातो. बाष्पीभवन थांबविणे आपल्या हातात नाही पण ते पाणी जमिनीत टाकणे तर आपल्या हातात आहे ना ? गेल्या १० वर्षांपासून सरकार व सेवाभावी संस्था पाऊस अडविण्यासाठी व जिरवण्यासाठी कळकळीचे आवाहन करीत आहेत. पण आपण मात्र त्याकडे सतत दुर्लक्षच करीत आलो आहोत. आज दुष्काळ निवारण्यासाठी एकच उत्तर आहे तो म्हणजे जलपुनर्भरण. ते आपण करणार नसाल तर काळ आपल्याला कधीच क्षमा करणार नाही. या पुनर्भरणाचा लाभ निव्वळ याच वर्षी नाही तर पुढील वर्षीसुध्दा होत असतो. उदाहरण द्यायचे झाल्यास शिरपूर प्रयोगाचे देता येईल. या वर्षी पावसाने दडी मारली आहे. कापसाच्या पेरण्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व्हावयास हव्यात.

महाराष्ट्रात त्या कोठेही झाल्या नव्हत्या त्यावेळी शिरपूर तालुक्यात २०,००० हेक्टरवर कापूस दीड फुटाचे वर वाढून आनंदाने डोलत होता. हे कशामुळे शक्य झाले ? तिथे जे नाल्यांचे रूंदीकरण व खोलीकरण झाले आहे त्यामुळे करोडो लिटर पाण्याचा जमिनीत संग्रह झाला आहे. मागील वर्षी मुरलेले पाणी आज शेतकर्‍यांना लाभदायक ठरले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात भूजल पातळी घसरत असतांना तिथे मात्र वाढलेली भूजल पातळी टिकून आहे. इतरांच्या अनुभवावरून आपण काही शिकणार आहोत की नाही ? श्री. सुरेश खानापूरकर, श्री. अण्णा हजारे, श्री. पोपटराव पवार व श्री. राजेंद्रसिंग यांना त्यांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामासाठी जग सलाम करीत आहे. आणि आपण दुष्काळ - दुष्काळ करीत रडत बसलो आहोत. आपले दु:ख कुरवाळत बसणार्‍यांचे कौतुक आता बंद झाले पाहिजे. पाणी नाही म्हणून ओरडा केला जातो, सरकारला जबाबदार धरले जाते पण स्वत:कडून प्रयत्न मात्र शून्य ही वास्तविकता कधी थांबणार ?

सध्या वर्तमानपत्रात वेगवेगळ्या खेडेगावात पाणी जमा करण्यात आलेल्या यशोगाथांचे वर्णन येत आहे. तसे केल्यापासून गावाला काय फायदा झाला हेही सांगितले जाते. आपल्या गावातील तरूणांनी एकत्र येवून गावात पाणी संकलनाच्या काय योजना आखता येतील याचा विचार करावा. श्रमदानाने गावातील नाल्यांचे खोलीकरण, रूंदीकरण करून त्यावर बंधारे बांधले तर आपले गाव सुध्दा जलसमृध्द होवू शकेल. पाणी प्रश्‍न कोणी निर्माण केला हो ? तो आपण निर्माण केला आहे. तो जर आपण निर्माण केला असेल तर त्यावर आपणच उपाय शोधून काढणे आवश्यक नाही का ?

खरे पाहिले असता आपल्या गावाला आवश्यक असणारे पाणी आपल्या गावातच आहे. आपली गत तुझे आहे तुझ्यापाशी पण तू वाट चुकलाशी अशी झाली आहे. आपल्या गावात पडणारे पावसाचे पाणी आपण जास्त हव्यास न ठेवल्यास आपल्याला पुरेसे आहे. पण पाण्याचे योग्य संकलन व संवर्धन न केल्यामुळे आपल्याला आज पाण्याची अडचण जाणवते. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुका आहे. मुळातच धुळे जिल्हा वर्षाछायेच्या प्रदेशात येत असल्यामुळे पाण्याच्या बाबतीत तुटीचा जिल्हा समजला जातो. तीच स्थिती शिरपूर तालुक्याची आढळते. इतके असूनसुध्दा योग्य संवर्धन झाल्यामुळे तो प्रदेश पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे. इथे जो प्रयोग झाला त्याला शिरपूर पॅटर्न या नावाने वाखाणण्यात येत आहे. हा प्रयोग श्री. सुरेश खानापूरकर यांनी केला. ते महाराष्ट्र सरकारच्या भूजल खात्यात सेवेत होते. निवृत्ती नंतर ते शिरपूर येथे दाखल झाले. त्यांना तेथील स्थानिक आमदार व उद्योगपती श्री. अमरिशभाई पटेल यांचा ठाम पाठिंबा मिळाला. यातूनच शिरपूर पॅटर्नचा जन्म झाला. एकशे पन्नास गावांना पाणी प्रश्‍न मुक्त करायचे असा त्यांचा संकल्प आहे. आतापर्यंत ५० गावात तो पूर्ण झाला असून ती गावे टंचाईपासून मुक्त झाली आहेत. हा प्रयोग फारच सोपा आहे. तो असा -

१. गावातले नाले हुडकून काढा. ते गाळाने भरलेले आढळतील.
२. त्या नाल्यांचे खोलीकरण करा.
३. त्या नाल्यांचे रूंदीकरण करा.
४. प्रत्येक नाल्यावर साखळी बंधारे बांधा.
५. जमा झालेला गाळ आजूबाजूच्या शेतकर्‍यांना वाहून न्यायला सांगा तो त्यांच्या शेतात पसरविल्यास त्यांच्या शेतीचे पोत सुधारेल.

असे केल्यास गावातले पाणी गावातच अडेल व जिरेल. त्यामुळे भूजल पातळीत भरपूर वाढ होईल. व जमलेल्या पाण्याचे भरवशावर दरवर्षी दोनच काय तर तीन पिके घेतली जावू शकतील. ही काही कवी कल्पना नाही. मी स्वत: या भागात फिरलो व स्वत: हे बदललेले चित्र अनुभवले आहे. आपणही गटागटाने या ठिकाणी भेट देवून विस्मयकारक बदल बघून स्वत:ची खात्री करून घ्या.

आपण सर्व गावकरी मिळून गावाची पिक पध्दती काय असावी याचा निर्णय घेण्याची गरज आहे. नाही तर एखादा शेतकरी ऊसासारखे पिक घेवून जमिनीतील पाणी आपल्याकडे ओढून घेतो व बाकीचे मात्र पाण्यासाठी तडफडत असतात. बोअर खणण्यात व विहीर खोल करण्यात स्पर्धा लागलेली आहे. लातूर सारख्या जिल्ह्यात तर काही शेतकर्‍यांनी १५०० ते १७०० फूट बोअर खणल्याची उदाहरणे आहेत. पाणी कोण वापरतो हे महत्वाचे नसून तो किती व कोणत्या पिकासाठी वापरतो हे महत्वाचे आहे. गुजराथ मधील एक उदाहरण डोळे उघडण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. एका माणसाचे डिटोनेटर्स विक्रीचे दुकान आहे. त्याच्याकडे एक माणूस डिटोनेटर्स खरेदी करण्यासाठी आला. त्याचा चेहेरा दुकानदाराच्या लक्षात राहिला. पुढील वर्षी जेव्हा पुन्हा डिटोनेटर्स खरेदी करण्यास आला तेव्हा त्याला आश्‍चर्य वाटले. मागील वर्षीच तू विहीर खोल केली होती, पुन्हा तुला डिटोनेटर्स कशासाठी हवेत असा सवाल त्याने ग्राहकाला विचारला. त्याने सांगितले, मला विहीर आणखी खोल करायची आहे. तेव्हा दुकानदाराच्या लक्षात आले की पाणी वाढविण्यासाठी विहीर खोल करणे हा उपाय नसून त्यात पावसाचे पाणी भरणे हा नामी उपाय होवू शकतो. पुढे तो दुकानदार जलपुनर्भरणाचा पुरस्कर्ता बनला व त्याने गुजराथेत पुनर्भरणाची चळवळच उभी केली.

श्री. पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारात किंवा श्री. राजेंद्रसिंग यांच्या अलवर जिल्ह्यात कोणी कोणते पिक लावायचे हे गावकरी ठरवतात. लोकांना एकत्र येण्यास ते संसद म्हणतात. ही संसद गावाची पिक रचना ठरविते. आपल्याला भूजलाचा नवीन कायदा माहित असेलच. भूजलावर सर्वांचाच हक्क असतो. तुमच्या शेतात असलेल्या विहीरीचे पाणी यावर तुमचा मालकी हक्क आता राहणार नाही. भूपृष्ठावरील पाणी जसे सर्वांच्याच मालकीचे राहते तसेच आता भूजलही सर्वांच्याच मालकीचे झाले आहे. अशा परिस्थितीत आजपर्यंत जसा तुम्ही अनिर्बंध उपसा करीत होते तशी परिस्थिती राहणार नाही. त्यामुळे आता पिक पध्दतीही सर्वांच्या सहकार्याने ठरविणे उचित ठरणार आहे.

आजचा जमाना लोकसहभागाचा आहे. गावातील कोणतेही काम सर्वांनी मिळून केले तर एकतेची भावना निर्माण होते व आपसातील प्रेमभावना वृध्दिंगत होते. या संदर्भात एक उदाहरण सांगणे आवश्यक वाटते. एकदा औरंगाबाद शहरातील काही अभ्यासक एका खेडेगावात गेले. गावकर्‍यांची त्यांनी सभा घेतली. गावकर्‍यांनी आपल्या वेगवेगळ्या समस्या सभेसमोर मांडल्या. त्या समस्यांची एक यादी करण्यात आली. एकंदर ८२ समस्या मांडण्यात आल्या. मग त्या समस्यांवर चर्चा सुरू झाली. या समस्या कोण सोडवू शकेल यावर चर्वितचर्वण झाले. तेव्हा असे लक्षात आले की त्या ८२ समस्यांपैकी ८० समस्यांचे उत्तर गावकर्‍यांच्या जवळच होते. तेच एकत्र मिळून समस्या सोडवू शकत होते. दुर्दैवाने आपण समस्यांचा बाऊ करतो व त्यामुळे त्या समस्या तशाच राहून जातात. आजकाल सरकारवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. कोणतीही समस्या आली की आपण सरकारकडे बोट दाखवून हे काम सरकारने करावे अशी आपली भावना झाली आहे. त्यामुळे आपण परावलंबी झालो आहोत. गणितात १० अधिक १० बरोबर वीस होतात. पण संघशक्तीमुळे ते १०० झालेले दिसतात. याचे महत्व आपण जाणून घेतले पाहिजे. कित्येक गावांनी आपला पाणी प्रश्‍न एकत्र येवून सोडवून घेतला आहे हे आपण दररोजच्या वर्तमानपत्रात वाचतच असतो.

गुजराथमध्ये मी आणि काही मित्रांनी एक अभ्यास दौरा केला होता. वर्तमानपत्रात माझ्या वाचनात असे आले की गुजराथने पाणी प्रश्‍न पूर्णपणे सोडविला आहे. माझा त्यावर विश्वासच बसला नाही. आपल्या राज्यात गुजराथपेक्षा दुप्पट पाऊस पडत असून सुध्दा आपले शेतकरी हलाखीचे जीवन जगतात. मग तिथेच हे कसे शक्य झाले आहे हे कोडे मला पडले. म्हणून खरी परिस्थिती काय आहे हे तपासून पाहणे हा या दौर्‍याचा उद्देश होता. आम्ही जवळपास १२ दिवस खेडोपाडी हिंडलो. आणि जे बघितले ते खरेच विस्मयकारक होते. गावोगाव आम्हाला एकच दृष्य दिसले, सर्व गावकरी एकत्र आले, माझी जात, माझा धर्म, माझा राजकीय पक्ष मी विसरून एकत्र येईन अशी शपथ गावकर्‍यांनी घेतली व पाणी प्रश्‍नाला हात घातला. त्यांनी गावातील सर्व नाले हुडकून काढले. प्रत्येक नाल्याला खोल व रूंद केले व नाल्यावर साखळी बंधारे बांधले.

काही वर्षांच्या काळात सव्वा लाखाच्या वर असे बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे पाणी वाहणे थांबले. थांबलेल्या पाण्याला मुरण्याशिवाय गत्यंतरच नसते. ते पाणी भरपूर प्रमाणात जमिनीत मुरले व भूजलाची पातळी सर्वत्र तीस चाळीस फुटांवर आली. आम्ही जे अभ्यासले ते थोडक्यात खालील प्रमाणे मांडता येईल -

१. सर्वत्र पाण्याची पातळी भरपूर वाढली.
२. त्याचा परिणाम म्हणून शेतकरी वर्षातून तीन पिके घ्यायला लागले.
३. शेती शाश्वत बनली.
४. शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती खूपच सुधारली.
५. ग्रामीण रोजगार वाढीस लागला.
६. पूर्वी ज्यांनी शहराकडे रोजगारानिमित्त धाव घेतली होती ते खेड्यात परत यायला लागले.
७. ग्रामीण विकासाचा दर शहरी विकासा इतका वाढला.
८. एवढेच नव्हे तर काही शेतकर्‍यांनी एक मासिक पगारावर तज्ज्ञांची नेमणूक सुध्दा केलेली आढळली.

या सर्वांचे मूळ गावकर्‍यांनी एकत्र येण्यात आहे हे आपल्या लक्षात आले असेलच. एकट्या दुकट्याचे हे काम नाही. हे पाहिल्यावर संघशक्तीचा विजय असो असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हे फक्त वाचून सोडून देवू नका तर ही गोष्ट अंमलात आणा ही सर्व ग्रामस्थांना कळकळीची विनंती. सरकारची मदत झाली तर उत्तमच पण पाणी प्रश्‍न सरकारच्या मदतीशिवाय सुध्दा सुटू शकतो याचे भान आपल्याला यावयास हवे.

आपण पावसाला म्हणू शकतो, बाबा, तुला पडायचे तेव्हा पड, पण जेव्हा तू पडशील तेव्हा सर्व शक्तीनिशी आम्ही थेंब अन् थेंब अडवू. आपण असे करू या, आपल्या गावाचे पाण्याचे अंदाजपत्रकच तयार करू या. आपल्या गावाचा आकार आपल्याला माहित आहे. त्याच प्रमाणे आपल्या गावाचे सरासरी पर्जन्यमान सुध्दा माहित आहे. त्यामुळे गावात किती पाऊस पडतो याचे गणित आपण सहजपणे तयार करू शकतो. खालील तक्ता बघा -

५०० मि.मी पाऊस पडत असेल तर दर एकरात २०,००,००० लिटर पाऊस पडतो
६०० मि.मी पाऊस पडत असेल तर दर एकरात २४,००,००० लिटर पाऊस पडतो.
७०० मि.मी पाऊस पडत असेल तर दर एकरात २८,००,००० लिटर पाऊस पडतो.
८०० मि.मी पाऊस पडत असेल तर दर एकरात ३२,००,००० लिटर पाऊस पडतो.

वरील तक्त्याचा अभ्यास केल्यास आपल्या गावाचा आकार (एकरात), आपल्या गावात सरासरीने पडणारा पाऊस (मि.मी मध्ये) यांचा गुणाकार केल्यास गावात एकूण किती पाऊस पडेल हे स्पष्टपणे कळू शकते. समजा आपल्या गावाचे क्षेत्रफळ १००० एकर आहे व आपल्या भागात ७०० मि.मी पाऊस पडतो असे असेल तर आपल्या गावात पडणारा एकूण पाऊस (२८ लाख लिटर गुणिले १००० एकर) २८० कोटी लिटर राहील. हा झाला पाण्याचा पुरवठा.

त्याचप्रमाणे गावाची पाण्याची मागणी काय याचेही गणित मांडता येते. पाणी घरगुती वापरासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी, छोट्या मोठ्या व्यवसायासाठी व गावाच्या पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक असते.

घरगुती वापरासाठी किती पाणी लागते हे काढण्यासाठी गावाची लोकसंख्या किती व प्रत्येकाला दररोज किती पाणी लागते हेही कळू शकते. त्यावरून दरमाणशी वर्षाला लागणारे पाणीही काढले जावू शकते. समजा गावाची लोकसंख्या १००० आहे. ग्रामीण भागात दररोज दरमाणशी ७० लिटर पाणी लागते असे मानक सांगते. म्हणजे वर्षाची मागणी १००० माणसे गुणिले ७० लिटर गुणिले ३६५ दिवस बरोबर जवळपास २५५ लाख लिटर एवढी असते. त्यात आपण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २५ टक्के वाढ करू या. म्हणजे गावाला लोकसंख्येसाठी लागणारे पाणी ३१९ लाख लिटर एवढे असेल.

जसा आपण माणसांना लागणारे पाणी किती याचा अंदाज काढला अगदी त्याचप्रमाणे गावातील जनावरांसाठी दररोज व दरवर्षी किती पाणी लागेल याचेही गणित तयार करू शकू. गावातील एकूण जनावरांची संख्या ग्राम पंचायतीच्या कार्यालयात मिळू शकेल. प्रत्येक जनावरास (गाय, म्हैस, घोडे, बकर्‍या इ.) किती पाणी लागते याची माहिती आपल्याला गुरांचे डॉक्टर देतील. हे सर्व गणित मांडून गावातील जनावरांना लागणारे पाणी किती लागेल हेही आपल्याला कळू शकेल.

प्रत्येक गावात काही छोटे मोठे व्यवसाय असतात. प्रत्येक व्यवसायाची पाण्याची गरज भिन्नभिन्न असते. अशा व्यावसायिकांना व्यक्तीश: भेटून त्यांची वर्षाची एकूण गरज काय याचा अंदाज तयार केला जावू शकतो. गावात एखादा मोठा कारखाना काढला जात असेल तर त्याची गरज काय याची खात्री करून घ्या. व त्याची गरज अवास्तव असेल व त्यामुळे गावावर पाण्याचे संकट येत असेल तर असा कारखाना काढण्यास गावकर्‍यांनी तीव्र विरोध करावयास हवा. नसता तो कराखाना गावातील सर्व पाणी गिळंकृत करून बसेल व गावकरी मात्र पाण्यासाठी तडफडत बसतील. उद्योगांबद्दल सांगण्यासारखी एक गोष्ट म्हणजे त्यांना लागणार्‍या पाण्यापैकी जवळपास ७५ ते ८० टक्के पाणी ते पुन्हा परत करत असतात. हे परत केलेले पाणी शुध्द करून त्यांनीच पुन्हा वापरले तर चालू शकते. असे केले तर त्यांची गावाच्या दृष्टीने पाण्याची गरज तशी कमीच राहाते.

पडणार्‍या पावसापैकी जवळपास निम्मे पाणी शेती व्यवसाय वापरत असतो. त्यातूनच माणसाला अन्न आणि वस्त्र व इतर कच्चा माल मिळत असतो. तशी पाहता ही मागणी बरीच मोठी आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याची बचत करायला मोठीच संधी उपलब्ध आहे. आपली पाणी वापरण्याची पध्दत यासाठी आपण तपासून पाहण्याची गरज निश्‍चितच आहे. आज पाण्याला पैशापेक्षा जास्त महत्व प्राप्त झाले आहे. प्रवाहाने शेतीला पाणी देण्याची आपली पारंपारिक पध्दती आहे. ही अत्यंत सदोष आहे. यामुळे पाणी जास्त तर लागतेच पण त्याचबरोबर ते पिकालाही मारक ठरते. आपण पाणी जमिनीला देतो. खरे पाहिले तर ते पिकांना द्यावयास हवे. रोपासाठी लागणारे पाणी मुळे घेत असतात. त्यांना पाणी मिळाले म्हणजे पुरे. आपण ज्या पध्दतीने पाणी देतो त्यामुळे मुळे गुदमरतात व रोपांची वाढ खुंटते. जास्त पाणी म्हणजे जास्त पिक ही आपली चुकीची समजूत आहे व ती आपण वर्षानुवर्षे करीत आलो आहोत. त्यामध्ये बदल करायला आपण तयार असले पाहिजे. आज सिंचनाच्या नवनवीन पध्दती उदयास येत आहेत. ठिबक सिंचन, तुषार सिंचन यांचा वापर वाढविला तर आपल्या जवळ उपलब्ध असलेले पाणी आपण जास्त क्षेत्राला वापरू शकतो व जास्त शेतीला सिंचनाचा लाभ मिळू शकतो.

गावाचे पर्यावरण रक्षण सुध्दा महत्वाचेच आहे. वृक्षवल्‍ली, कुरणे, पक्षी, कीटक हे पर्यावरणातील महत्वाचे घटक आहे. यांना सुध्दा पाणी लागतच असते. निसर्गाने काही चक्रे निर्माण केली आहेत. हे सर्व त्या चक्रांचे घटक आहेत. माणूस धरून हे सर्व एकमेकास पूरक आहेत. नद्या वाहत्या असाव्यात. त्याचा किमान प्रवाह टिकवून ठेवणे ही महत्वाचे असते. शेतीसाठी जेवढे पाणी लागते त्याच्या निम्मे पाणी या घटकांसाठी लागते.

आज पाणी दिसले रे दिसले की पुढचा मागचा विचार न करता आपण ऊस या पिकाकडे वळतो. त्यामुळे आपल्याला शाश्वत उत्पन्न मिळते हे जरी खरे असले तरी आपण हे पिक घेवून इतरांवर अन्याय तर करीत नाही ना याचा पण विचार करावयास हवा. आपण उपसत असलेल्या पाण्यामुळे भूजलाचे किती नुकसान होत आहे याचा विचार कोणी करायचा ? भूजल हे राखीव पाणी आहे. तेच जर मोठ्या प्रमाणात वापरून टाकले व पुढच्या वर्षात पावसाने दगा दिला तर निव्वळ आपलेच नाही तर समाजाचे काय हाल होतील याचा विचार कोणी करायचा ? २०१२ चा दुष्काळ आठवतो ना ? या वर्षाच्या दुष्काळाने महाराष्ट्राचे डोळे पांढरे होण्याची पाळी आली होती. या दुष्काळासाठी प्रामुख्याने ऊस हेच पिक जबाबदार होते. या पिकाने अति पाणी वापरल्यामुळे पिण्यासाठी सुध्दा पाणी मिळणे दुरापास्त झाले होते.

इतरांना पाणी मिळाले नाही तरी चालेल पण माझा ऊस वाचला पाहिजे ही प्रत्येक ऊस उत्पादकाची इच्छा होती. वर्षानुवर्षे एकाच जमिनीवर ऊस घेवून जमीन नापिकीकडे वाटचाल करीत आहे याचे भानही या ऊस उत्पादकांना राहिलेले नाही. आपला देश एवढा सुपिक असून सुध्दा आपल्याला गळीताची धान्ये व कडधान्ये मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागतात. त्यावर आपले परकीय चलन वाया जात आहे. यापैकी काही पाणी जरी आपण या पिकांकडे वळवू शकलो तर या पिकांचेही उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकते. आपल्या राज्यातील जवळपास ७५ ते ८० टक्के पाणी ऊस हे एकमात्र पिक वापरून टाकत आहे ही देशाच्या दृष्टीने एक गंभीर बाब समजावयास हवी. गुजराथमध्ये एवढे पाणी असतांना तुम्ही ऊस का लावत नाही हा प्रश्‍न आम्ही त्या शेतकर्‍यांना विचारला. त्यांनी दिलेले उत्तर कदाचित आपल्याला आवडणार नाही, ते म्हणाले, ऊस घेण्यासाठी हे पाणी वापरण्याइतके आम्ही मूर्ख नाही. त्याच्या ऐवजी आम्ही वर्षात तीन पिके घेतली तर आम्हाला जास्त लाभ होतो. या उत्तरापासून आपण काही शिकणार की नाही ?

आपल्या गावातील पाण्याची आपणच काळजी घेवू या :


आपले गाव किती केले तरी आपले गाव आहे. त्याची काळजी आपण नाही घ्यायची तर कोणी घ्यायची ? पाणी प्रश्‍न हा आपला आहे. तो आपणच सोडवावयास हवा. आतापर्यंत आपण आपल्या गावात किती पाणी असू शकते याचा विचार केलेला आहे. फक्त ते अडवायचे कसे आणि जिरवायचे कसे व गावाचा पाणी प्रश्‍न कसा सोडवायचा याचा विचार करू या. त्यासाठी खालील सूत्र आपल्याला उपयोगी पडेल :

गाव तिथे गावतळी शेत तिथे शेततळे
नाला तिथे बंधारे विहीरी तिथे पुनर्भरण

गाव तिथे गावतळी :


पूर्वीचे काळी भारत हा तलावांनी समृध्द असा देश होता. ती भारताची ओळख होती. त्या तलावांचा प्रत्येक गावात विविध कामांसाठी वापर केला जात असे. प्रत्येक गाव पाण्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होते. गावकरी महिन्यातील दोन दिवस स्वत:च्या शेतावर जात असत. या दोन दिवसात संपूर्ण गाव तलावांची साफसफाई करण्यात व्यस्त असे. यासाठी अमावस्या आणि पौर्णिमा हे दोन दिवस राखून ठेवलेले असत. या तलावांमधील पाणी जमिनीत मुरत असे व त्यामुळे भूजल पातळीही वाढण्यास मदत होत असे. तलावांशी लोकांचे भावनिक नाते होते. व त्यामुळे त्यांची देखरेख व काळजी घेण्याचे काम सर्व नागरिक करीत असत. भारतावर इंग्रजांचे आक्रमण झाले. नवीन सरकारने तलावांचे व्यवस्थापन आपल्या हातात घेतले व त्यामुळे गावकर्‍यांचा तलावांशी संबंध संपला. ब्रिटीश सरकार गेले तरी त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था आजही टिकून आहे. तलावांचे जे काही बरेवाईट करायचे ते सरकारने करावे अशी सर्वसाधारण भावना निर्माण झाली. वाढत्या लोकसंख्येमुळे, अदूर दृष्टीमुळे व निष्काळजीपणामुळे या तलावांवर आक्रमण होत गेले व कित्येक तलाव नष्ट झाले. बरेचशे तलाव वाढत्या लोकवस्तीसाठी बुजवून टाकण्यात आले. गावातील सर्व सांडपाणी तलावांमध्ये सोडावयास सुरूवात झाली व तलावांचे पावित्र्य नष्ट झाले, तलाव ही घाण पाण्याची डबकी बनली. ते पाणी पिण्यास अयोग्य ठरू लागले. गावात पाणी प्रश्‍न निर्माण झाला. गावाची पाण्याबाबतची स्वयंपूर्णता नष्ट झाली.

ही परिस्थिती आता आपल्याला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून बदलायची आहे. गावोगाव नवीन तलावांची निर्मिती करायची आहे. प्रत्येक गावाची गरज म्हणून किमान तीन तलाव आवश्यकच आहेत. पहिला तलाव पिण्याच्या पाण्यासाठी, दुसरा तलाव जनावरांसाठी व तिसरा शेतीच्या सिंचनासाठी.

या आधी आपण गावातील लोकांसाठी पाण्याची गरज अभ्यासलेली आहेच. प्रत्येक व्यक्तीला किती पाणी लागते हेही आपण पाहिले आहे. गावाची लोकसंख्या किती आहे हे पण आपल्याला माहित आहे. अशा परिस्थितीत या तलावांचा आकार काय असावा हे आपण गणिताद्वारे शोधून काढू शकतो. या तलावांच्या निर्मितीसाठी आपण ग्राम पंचायतीवर, जिल्हा परिषदेवर व सरकारवर दबाव आणू शकतो. असे करतांना हा तलाव खोदण्यासाठी आम्हीही योगदान करावयास तयार आहोत याची हमीही गावकर्‍यांनी द्यायची आहे. असा तलाव तयार झालाच तर त्या तलावाच्या देखरेखीची व स्वच्छतेची हमीही आपल्यालाच घ्यायची आहे. या तलावात आंघोळ करणे, कपडे धुणे यावर बंदी घालावी. तलावापासून थोड्या अंतरावर यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.

दुसरा तलाव जनावरांच्या स्वच्छतेसाठी व पाणी पिण्यासाठी असावा. जनावरांना पहिल्या तलावांकडे फिरकू देवू नये. आपल्या गावात वेगवेगळ्या प्रकारची जनावरे आहेत याची नोंद ग्रापंचायतीत असते. प्रत्येक प्रकारच्या जनावरांची पाण्याची गरज काय हेही आपण शोधून काढू शकतो. यावरून या तलावाचा आकार निश्‍चित करावा.

तलावांची खरी गरज आहे शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी. दक्षिण भारतात शेतीसाठी पाणी ही समस्या तलावांद्वारे सोपविण्यात आली आहे. त्या चारही राज्यांत तलावांची भरपूर संख्या आढळते. आपल्या राज्यात शेतीला पाणी मिळावे म्हणून मोठमोठी धरणे बांधण्यात आली आहेत. पण त्या धरणांचा लाभ सर्व शेतकर्‍यांना मिळणे अशक्य आहे. कारण त्या धरणांच्या कमांड एरियात आपले गाव नसण्याची शक्यताच जास्त आहे. अशा धरणांचा लाभ फक्त १३ टक्के जमिनीलाच मिळणार आहे. त्यामुळे आपण त्या कामावर विसंबून न राहता आपल्या गावातील शेतीचा प्रश्‍न सोडविण्याचे दृष्टीने अशा तलावांची गरज ओळखली पाहिजे.

सरोवर संवर्धिनी ही आज काळाची गरज आहे. गावातील तलावांचे संवर्धन व्हावे, त्यातील पाणी शुध्द राहावे, तलाव ही गावाची शान राहावी, त्यात प्रदूषण होण्याचे टाळावे यासाठी गावकर्‍यांनी एकत्र येवून अशा संस्था स्थापन कराव्यात. अशा संस्था स्थापण्यासाठी गावकर्‍यांनी पुढाकार घ्यावा. जे जे म्हणून त्या तलावांचे लाभार्थी आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येवून अशी संवर्धिनी स्थापन करावी. परदेशात अशा संस्था खूप मोलाची कामगिरी करीत असतात. त्यामुळे हा तलाव माझा आहे अशी आपुलकीची भावना निर्माण होते व तलाव सुरक्षित रहातात.

अशा प्रकारे तीन तलाव असतील तर गावकर्‍यांना पाण्यासाठी दारोदार भटकण्याची आवश्यकता पडणार नाही. आज गावातले पाणी संपले तर शहरी भागात लोंढेच्या लोंढे स्थलांतरित होत असतात. माझे जवळ पाणी आहे ही शाश्वती असेल तर शेतीला व गावाला स्थैर्य येवू शकते.

शेत तिथे शेततळी :


कोरडवाहू शेती हा आपल्या देशाला लागलेला एक शाप आहे. पाण्याअभावी शेती कसता येत नाही. शेतकर्‍यांची अर्थव्यवस्था नेहेमी डामाडोल रहाते. व शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार बनतो. खरे पाहिले असता महाराष्ट्रात असे एकही गाव नाही जिथे सरासरीने पाचशे मि.मी पेक्षा कमी पाऊस पडतो. असे असेल तर प्रत्येक एकरात सरासरीने २०,००,००० लिटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. तुमच्याकडे पाच एकर शेती असेल तर पाण्याच्या बाबतीत तर तुम्ही करोडपतीच आहात की. १ कोटी लिटर पाणी शेतीत असतांना कशाला विनाकारण कोरडवाहू शेतकरी म्हणवून घेता? हे पाणी साचविले, सांभाळून वापरले तर वर्षातून दोन पिके हमखास हातात येवू शकतात.

शेतकर्‍याला पाण्याची गरज प्रामुख्याने तीनदा भासत असते. जून महिन्यात पेरणी झाल्यावर पाऊस दडी मारतो. रोपांची उगवण झालेली असते. पण ताण बसल्यामुळे रोपे मान टाकावयास लागतात. अशा वेळी पाणी मिळाले नाही तर रोपे जळून जाण्याची शक्यता राहते. या वेळी पाणी असल्यास पिक वाचू शकते. दुसरी गरज रब्बी पिकाचे वेळी उद्भवते. पेरणी करतांना जमिनीत पुरेसे ओल राहात नाही. त्यायमुळे उगवण कमी होते. चांगली उगवण होण्यासाठी ओल पाहिजे असेल तर पाणी शेतकर्‍यांच्या संग्रही असावे लागते. तिसरी गरज रब्बी पिकात जेव्हा दाणे भरू लागतात त्यावेळी ओल नसेल तर दाणे कमी प्रमाणात भरतात व जे भरतात ते बारीक पडतात. त्यामुळे पिक चांगले दिसत असून सुध्दा उतारा कमी भरतो. या वेळी पाणी असेल तर होणारे नुकसान टळते. वरील तीनही परिस्थितीत जमा केलेले पाणीच शेतकर्‍याला लाभदायक ठरते. यामुळे खरीप व रब्बी अशी दोनही पिके साधतात.

खरे पाहू गेल्यास शेतकर्‍यांचे शेत हेच एक पाणलोट क्षेत्र असते. पाणलोट क्षेत्र विकास म्हणजे तरी काय हो ? पाणलोटाचा एकूण प्रवाह लक्षात घेता त्या परिसरातील पाणी योग्य प्रकारे संग्रही करून त्या पाण्याच्या सहाय्याने प्रदेशाचा विकास साधणे ही बाब पाणलोट विकासात अभिप्रेत आहे. हेच तत्व आपण आपल्या शेताला लागू केल्यास पाणलोट क्षेत्र विकास ही संकल्पना आपण आपल्या शेतातच राबवू शकतो. आपल्या शेताचा उतार लक्षात घेता अशा चारपाच जागा तरी असू शकतात ज्या ठिकाणी पाण्याचा योग्य संग्रह होवू शकतो. काही जागा खोल करणे, काही ठिकाणी बंधारे बांधणे व शेतातले पाणी शेतातच कसे राहील याचा सारासार विचार करणे आपणास सहज शक्य आहे. मग वाट कोणाची पाहता ? करा आपल्याच हाताने आपल्या शेताचा विकास.

बहुतांश शेतकरी शेततळ्याच्या विरोधात असतात. शेततळे खणतांना तेवढी जागा वाया जाते अशी त्यांची तक्रार असते. पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही की शेततळे असेल तर शेती शाश्वत बनते एवढेच नाही तर पाणी मिळाल्यामुळे बाकीच्या जमिनीत पिक जोमाने वाढून उत्पन्नात भर पडते.

सरकारच्या मदतीने शेततळे झाल्यास उत्तमच. पण सरकारी यंत्रणेचा भपका जास्त पण काम कमी असा सर्वत्र अनुभव आहे. शिवाय चिरीमिरी वाटत वाटत हातात किती पैसे पडतील व केव्हा मिळतील याचा आजकाल भरवसाच राहिला नाही. माझे तर म्हणणे आहे की जो सरकारवरी विश्वासला त्याचा कार्यभाग बुडाला अशी परिस्थिती प्रत्यक्षात आढळून येते. अशा परिस्थितीत आपण स्वत:च्या हिंमतीवर शेततळे खणू.

नाला तिथे बंधारे :


शिरपूर पॅटर्नने आपले डोळे निश्‍चितच उघडले असतील. हा अत्यंत यशस्वी प्रयोग महाराष्ट्रात वाखाणल्या गेला आहे. या प्रयोगाला आता राजाश्रय पण मिळाला आहे. सरकारनेच हा प्रयोग उचलून धरला आहे. गावोगाव हा प्रयोग राबवावा म्हणून सरकारने तसे आदेशही काढले आहेत. शिरपूर तालुक्यात हा प्रयोग १५० गावात राबविला जाणार आहे. त्यापैकी ५० गावातील काम पूर्ण झाले असून शेतकर्‍यांना भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. सध्या महाराष्ट्रात २० जिल्ह्यात प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली असून तिथेही यश मिळत आहे. प्रयोग अत्यंत साधा व सोपा आहे. गावातले नाले शोधा, त्या नाल्यांना रूंद करा, खोल करा व प्रत्येक नाल्यावर १५ ते २० साखळी बंधारे बांधा असा हा प्रयोग आहे. यामुळे पाणी अडते, जिरते व गावातले पाणी गावतच राहाते. पाण्याचा एक महत्वाचा नियम आहे. तो म्हणजे पावसाचा थेंब जिथे पडतो तिथेच अडवा असा आहे. या प्रयोगामुळे ते शक्य होते व गाव पाण्याने समृध्द होते. श्री. आण्णा हजारे यांनीही जवळपास असाच प्रयोग राळेगणसिध्दी येथे केला आणि त्यालाही यश लाभले आहे.

आपणास एक नम्र विनंती आहे. ती ही की निव्वळ वर म्हंटले आहे म्हणून आपण ते करू नका. आपण १५ तरूण शेतकर्‍यांचा एक गट करा. स्वत: शिरपूर येथे जावून केलेले काम आपल्या डोळ्यांनी बघा व मगच प्रत्यक्ष निष्कर्षांवर या. श्री. खानापूरकर यांचे म्हणणे आहे की पावसाला जेव्हा पडायचे तेव्हा पडू द्या. आपण त्याच्या संग्रहासाठी मोठाली भांडी निर्माण करा, त्या भांड्यात ते पाणी साठवा व स्वत:च्या मर्जीप्रमाणे जेव्हा ते वापरायचे तेव्हा ते डोळसपणे व काटकसरीने वापरा. हाच यशस्वी प्रगतीचा मार्ग होय.

आज आपण दररोज वर्तमानपत्रात वाचतच असाल की हा प्रयोग गावोगाव ग्रामस्थ अंमलात आणत आहेत. नाला अडला की नाल्याच्या दोहो बाजूला एक ते दोन किलोमीटरपर्यंत असलेल्या विहीरींची जलपातळी भरपूर वर येते व पाणी उन्हाळ्यात सुध्दा उपलब्ध राहाते. हा प्रयोग आपण करून पाहायला काय हरकत आहे ? मध्यंतरी अहमदनगर जिल्ह्यात पाथरी तालुक्यातील एका खेडेगावात स्थानिक जनकल्याण समितीच्या माध्यमातून असा बंधारा बांधण्याचा एक प्रयोग करण्यात आला. त्या बंधार्‍याच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला जाण्याचे सौभाग्य मला लाभले. बंधार्‍यापलिकडे दीड ते दोन किलोमीटर पर्यंत झालेला जलसाठा खूप समाधान देवून गेला. अहमदनगर जिल्हा अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा तुटीच्या प्रदेशात एवढे मोठे पाणी साठणे ही एक किमयाच होती. कार्यकर्त्यांनी जवळपास दोन कोटी लिटर पाणी साठा झाला असल्याचे सांगितले. या साठ्याच्या जवळपास चौपट पाणी पाझरून जमिनीत जमा झाले होते. त्याचा दृष्य परिणाम म्हणून बंधार्‍याच्या दोहो बाजूंना दीड किलोमीटर परिसरातील विहीरींची पाण्याची पातळी २५ ते ३० फूटावर आलेली आढळली.

विहीर तिथे पुनर्भरण :


आपल्या राज्यात खेडोपाडी अगणित विहीरी आहेत. आपल्याही गावात असतील. पावसाचे पाणी जर विहीरीत भरले तर विहीरीत ते उभे व आडवे पाझरून भूजल पातळी वाढण्यास मदत होते. ज्या विहीरी उन्हाळ्यात आटतात त्याही बारमाही पाणी द्यायला लागतात. असे बारमाही पाणी शेतात उपलब्ध असेल तर शेती शाश्वत बनते व वर्षातून दोन पिके हमखास मिळण्याची हमी मिळते. हे करण्यासाठी खर्चही अत्यंत कमी येतो व एकदा केलेले काम कायमचे होते. त्यावर पुन्हा पुन्हा खर्च करावा लागत नाही. हे काम करणे अत्यंत सोपे पण आहे. ते करण्याची कृती समजून घ्या. ती खालीलप्रमाणे -

१. विहीरीपासून थोड्या अंतरावर एक खड्डा खणा. त्याचा आकार २० फूट लांब, २० फूट रूंद व १० फूट खोल असा ठेवा. आवश्यकतेप्रमाणे हा आकार बदलू शकतो. शेतातील पाणी या खड्ड्याकडे वळवा. म्हणजे पावसाळ्यात हा खड्डा सतत भरत राहील.

२. याच खड्ड्याच्या थोड्या अंतरावर ( विहीरी व मोठा खड्डा यामध्ये) एक छोटा खड्डा खणा. त्याचा आकार ५ फूट लांब, ५ फूट रूंद व ६ फूट खोल असा ठेवा. हा आकार सोयीप्रमाणे कमी जास्त राहू शकतो.

३. हे दोनही खड्डे वरच्या पातळीने दोन ६ इंच पी.व्ही.सी पाईपने एकमेकास जोडा. म्हणजे मोठा खड्डा पाण्याने भरला त्यावेळी त्यातले पाणी आपोआप छोट्या खड्ड्यात शिरेल. मोठ्या खड्ड्यातला कचरा व गाळ यामुळे छोट्या खड्ड्यात येणार नाही. तो मोठ्या खड्ड्याच्या तळाशी साचून राहील.

४. छोट्या खड्ड्याच्या बुडापासून दोन ६ इंच पी.व्ही.सी. पाईपचे तुकडे विहीरीला जोडा म्हणजे त्या पाईपातून या खड्ड्यातले पाणी विहीरीत उतरेल.

५. छोट्या खड्ड्यात छोटे दगड, विटांचे तुकडे व जाडी रेती समथरात भरा. हे करणे यासाठी आवस्यक आहे की त्यामुळे आत जाणारे पाणी गाळून मगच विहीरीत उतरेल.

६. दरवर्षात करण्यासाठी फक्त एकच काम राहील. ते म्हणजे मोठ्या खड्ड्यात जमा होणारा गाळ काढून तो साफ करणे व छोट्या खड्ड्यातील मटेरीयल बाहेर काढून, साफ करून पुन्हा खड्ड्यात रचून ठेवणे.

७. हे कसे करायचे याची आकृती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे काय करायचे हे चांगल्याप्रकारे समजून येईल.

जलसाठे वाढविण्याची ही चतु:सूत्री गावकर्‍यांनी अंगीकारल्यास गाव जलसमृध्द होवून गाव आपला विकास सहजपणे करू शकेल. हेच राजेंद्रसिंगांनी केले, आण्णा हजारेंनी केले, पोपटराव पवारांनी केले व सुरेश खानापूरकरांनी केले. आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून समृध्दीची वाटचाल करू या. आपल्या प्रत्येक माणसाच्या मनात एक राजेंद्रसिंग, एक आण्णा हजारे, एक पोपटराव पवार, एक सुरेश खानापूरकर दडला आहे. वेळ आहे त्याला बाहेर काढायची. त्यांच्यामध्ये व आपल्यात तसा काय फरक आहे ? तीही आपल्यासारखी माणसेच आहेत. मग त्यांच्यात व आपल्यात काय फरक आहे ? त्यांच्याजवळ तीव्र इच्छाशक्ती आहे, ती मात्र आपल्याजवळ नाही. मनात आणले तर काहीही होवू शकते, नसता काहीही होत नाही. आपल्या जवळ पाणी होते, पाणी आहे व पाणी राहील. फक्त त्याचा संभाळ करायला शिकणे गरजेचे आहे. म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.

Posted by
Get the latest news on water, straight to your inbox
Subscribe Now
Continue reading